महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा तुफान शब्दयुद्ध पेटलं आहे. यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे संजय राऊत यांनी पोस्ट केलेला एक उपरोधिक फोटो, ज्यामुळे शिंदे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. राजकीय टीकाटिप्पणीतून आता सोशल मीडियावर थेट प्राण्यांची उदाहरणं वापरून टोलेबाजी सुरू झाली आहे.

राऊतांचा फोटो आणि त्यामागचा संदर्भ
संजय राऊत यांनी ट्विटरवर एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे, असा फोटो पोस्ट केला. त्याला ‘खबर पता चली क्या ए सं शी गट…’ असं उपहासात्मक कॅप्शन दिलं होतं. फोटोच्या मजकुरात बकऱ्याला दिल्लीहून सांगितल्याचं आणि फक्त “बे-बे” करत गप्प राहण्याचं सूचित केलं होतं. राऊतांच्या या व्यंगात्मक शैलीने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली.
नरेश म्हस्केंचा गाढवा आणि कवितेचा प्रत्युत्तर
याच्या प्रत्युत्तरात शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी एका गाढवाचा फोटो ट्विटरवर शेअर करत एक उपरोधिक कविता पोस्ट केली. या कवितेत राऊतांवर नाव न घेता जोरदार टीका करण्यात आली. “नवाच्या भोंग्याने पुन्हा दिली बांग…” अशा ओळींतून त्यांनी संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकेवर आणि निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मिळालेल्या अपयशावर उपहास केला.
संजय शिरसाट यांचाही राऊतांवर घणाघात
या वादात शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही उडी घेतली. “आम्ही निदान बकऱ्याच्या भूमिकेत आहोत, पण राऊत तुम्ही तर उंदरासारखे बिळात लपलेले आहात,” असा थेट हल्लाबोल करत त्यांनी राऊतांच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
वादाचा पुढचा टप्पा कुठे नेईल?
सध्या या दोन्ही गटांत टीकेची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेला हा संघर्ष राजकीय सभांमध्येही पोहोचण्याची शक्यता आहे. दोन्ही गट आपली बाजू उचलून धरत आहेत, त्यामुळे पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.