26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबठा गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “देशाच्या सुरक्षेचा खरा विचार असेल तर पुलवामाच्या हल्ल्याचंही क्रेडिट घ्या. कुलभूषण जाधवला भारतात परत आणा. मेहुल चोक्सी आणि निरव मोदीला देखील आणा,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टोला लगावला.

पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “राणा भारतात आला ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे. पण याचे श्रेय संपूर्णत: भाजपने घेण्याची गरज काय? अशा कार्यांमध्ये कायदेशीर यंत्रणांचे श्रेय महत्त्वाचे असते. अबू सालेमलाही कायदेशीर प्रक्रियेने भारतात आणण्यात आलं होतं, त्याच धर्तीवर ही कारवाई झाली आहे. यावर ‘फेस्टिवल’ उभारून श्रेय लाटू नका.”
राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, एखाद्या आरोपीला भारतात आणल्याने देशाची सुरक्षितता पूर्ण होत नाही. “जर भाजपला इतकं श्रेय हवं असेल, तर त्यांनी मोठ्या मुद्द्यांवर काम करून दाखवावं,” असंही ते म्हणाले.