मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील बहुप्रतिक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग लवकरच आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यासह प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मेट्रो लाइन 3 मधील टप्पा 2A, ज्यामध्ये बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश आहे, त्याचे परीक्षण आता अंतिम टप्प्यात आहे.

यासंदर्भात मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (CMRS) पथक मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी मार्गिकेची पाहणी सुरू केली आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच या मार्गिकेवर प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे.
भुयारी मेट्रोने वरळी गाठणे होणार सोपे
मुंबई मेट्रो 3 हा ३३.५ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग असून त्यात एकूण २७ स्थानके भूमिगत आहेत. हा मार्ग मुंबईतील चर्चगेटपासून वांद्रे, बीकेसी, आरे पर्यंत जोडणारा आहे. या टप्प्याच्या कार्यान्वयनामुळे दादर आणि वरळीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टप्पा 2A सुरू झाल्यानंतर, आरे, मरोळ नाका, सांताक्रुझ, बीकेसी येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट आचार्य अत्रे चौक आणि वरळीपर्यंत भुयारी मेट्रोने पोहचता येणार आहे.
मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा आधीच सुरू
या भुयारी मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता दुसरा टप्पा सुरू करून प्रवाशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रकल्पाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मार्फत सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने उर्वरित मार्गही प्रवाशांसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे.