उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात (मनसे) थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये, हिंदी भाषिक नागरिकांवर झालेल्या कथित हल्ल्यांचा उल्लेख करत मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकेमध्ये राज ठाकरे यांच्यावर हिंदी भाषिकांविरुद्ध द्वेषभावना पसरवणारी भाषणे दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सुनील शुक्ला यांनी मुंबईतून दाखल केलेल्या याचिकेमध्ये असे नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांत त्यांना त्यांच्या उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी उभं राहिल्यामुळे धमक्या, छळ आणि शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. या घटना केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता सार्वजनिक हिंसाचाराच्या पातळीपर्यंत गेल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या याचिकेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला मनसेची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत अॅड. श्रीराम परक्कट यांनी बाजू मांडली असून, राज ठाकरे यांच्यावर द्वेषमूलक भाषणांसंबंधी आधीच अनेक तक्रारी दाखल असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
सुनील शुक्ला काय म्हणाले?
“राज ठाकरे यांनी हिंदूंना मारण्याचा आदेश दिल्यासारखे वाटते. ते केवळ उत्तर भारतीयच नव्हे, तर मराठी जनतेच्याही विरोधात आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात न्यायालयात गेलो असून, संविधानाचे उल्लंघन कोणीही करू शकत नाही. आम्ही याचा निषेध करतो आणि न्यायालयातून कठोर आदेश मिळवणार आहोत,” असा ठाम इशारा शुक्ला यांनी दिला.
या घडामोडीमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, यापुढे काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.