राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याच्या या योजनेचा लाभ हजारो महिलांना मिळत आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे एकूण 9 हफ्ते आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

एप्रिलचा हप्ता कधी?
महिलांना सध्या सर्वाधिक उत्सुकता आहे ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलचा हप्ता 30 तारखेला, म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने यापूर्वी सांगितले होते की, प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला रक्कम जमा केली जाईल, मात्र एप्रिलमध्ये विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गैरव्यवहाराचा प्रकार उघड
या योजनेच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानखुर्द परिसरात 35 महिलांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे 20 लाख रुपयांचं कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका महिलेसह आणखी चार ते पाच जणांची भूमिका संशयास्पद असून, यामध्ये एका वित्त संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
राज्य सरकारने जानेवारी महिन्यात सांगितले होते की, अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी केली जाईल. पण त्यानंतरची माहिती पाहता, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत लाभार्थ्यांची संख्या वाढली असून, जानेवारीत 2 कोटी 41 लाख महिलांना अनुदान मिळाले होते, तर फेब्रुवारी व मार्चमध्ये ही संख्या 2 कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे पडताळणी खरंच झाली का, यावर शंका उपस्थित केली जात आहे.