सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजेंद्र घनवट आणि राजश्री मुंडे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या दोघांनी राजकीय संबंधांचा गैरफायदा घेत ११ शेतकऱ्यांची जमीन बळकावली. या जमिनींचे बाजारमूल्य तब्बल २० कोटी रुपये असून, केवळ ८ लाख रुपयांमध्ये त्या खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनींवर बेकायदेशीर व्यवहार?
दमानिया यांनी सांगितले की, अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या जमिनींवर अन्याय झाल्याची व्यथा मांडली. काही प्रकरणांमध्ये तर मृत व्यक्तींच्या नावाने व्यवहार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. उदाहरणार्थ, मिरा सोनावणे यांच्या घरचे सदस्य १९५७ मध्ये निधन पावले, पण २००७ मध्ये त्यांच्या नावावर जमीन खरेदी-विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे.
शेतकऱ्यांवर दबाव आणि खोट्या केसेस
दमानिया यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांनी न्याय मागितल्यास त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. काहींना ३०७ (खूनाचा प्रयत्न) सारख्या गंभीर आरोपांमध्ये अडकवले गेले. पोलीस यंत्रणा आणि राजकीय दबाव वापरून शेतकऱ्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
“सत्य समोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” – दमानिया
या प्रकरणावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी दमानिया यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आव्हान दिले की, घनवट आणि त्यांच्या साथीदारांनी कितीही मानहानीचे दावे केले तरी सत्य बाहेर येणारच.
“दहशतीमुळे जमिनीपासून दूर राहावे लागले”
या प्रकरणातील एका पीडित शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या वडिलांवर दबाव आणला गेला आणि काही मिनिटांत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अनेक शेतकरी तब्बल १० वर्षांपासून आपल्या जमिनींवर जाऊ शकले नाहीत.
अंजली दमानिया यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल.