बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यभरात वातावरण तापले होते. या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले सध्या बीडच्या कारागृहात आहेत. मात्र त्यांना तुरुंगात मारहाण झाल्याची बातमी समोर येताच प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.

महादेव गित्तेचा मोठा दावा
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने ही माहिती फेटाळून लावली आहे. तुरुंगात कोणतीही मारहाण झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणानंतर महादेव गित्ते याला बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आले.
महादेव गित्तेने यावेळी मोठा गौप्यस्फोट केला. त्याने सांगितले की, “वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली आहे. आम्हाला अन्यायकारक पद्धतीने मारहाण करून छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आले. या प्रकरणात अक्षय भैय्याचा काहीही संबंध नाही.”
तुरुंग प्रशासनाचे स्पष्टीकरण
या सर्व प्रकरणावर तुरुंग प्रशासनाने अधिकृत प्रेस नोट जारी केली आहे. त्यांनी माध्यमांमध्ये पसरत असलेल्या मारहाणीच्या बातम्यांना पूर्णतः खोडून काढले आहे. प्रशासनानुसार, “वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कोणतीही मारहाण झालेली नाही. तुरुंगातील सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.”
या प्रकरणावर पुढील कायदेशीर कारवाई कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.