बीडच्या तुरुंगात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, वाल्मिक कराडने एका केसमध्ये अडकवल्याचा राग गित्ते आणि आठवले यांच्या मनात होता. याच रागातून त्यांनी तुरुंगातच कराडला मारहाण केली. गेल्या आठवड्यापासून गँगमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, ज्याचा शेवट अखेर या हल्ल्यात झाला.
गँगमधील वादाची परिणती मारहाणीत
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले ज्या बॅरेकमध्ये होते, त्याच्या शेजारीच महादेव गित्ते आणि अक्षय आठवले हे शिक्षा भोगत होते. दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. यामुळे राग अनावर झालेल्या गित्ते आणि आठवले यांनी कराडवर हल्ला केला.
तुरुंग प्रशासनाने या घटनेची पुष्टी अद्याप केली नसली तरी या प्रकारामुळे तुरुंगातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडच्या सुरक्षेसंदर्भात आता तपास सुरू करण्यात आला आहे.