बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाणीला सामोरे जावे लागल्याची शक्यता आहे. सध्या हे दोघेही बीडच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. विशेष म्हणजे, मकोका अंतर्गत तुरुंगात असलेल्या इतर आरोपींमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, कराड आणि घुले यांच्या शेजारच्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा मकोका अंतर्गत शिक्षा भोगत असलेला एक अन्य आरोपी आहे. त्याचबरोबर परळीतील महादेव गीते या आरोपीसोबत देखील त्यांची बाचाबाची झाली. ही वादावादी इतकी चिघळली की त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे समजते. तथापि, या प्रकरणावर अद्याप तुरुंग प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासन या घटनेच्या सखोल चौकशीसाठी पुढील पावले उचलत असल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी अधिकृत माहितीची प्रतिक्षा कायम आहे. आरोपींमधील अंतर्गत वाद आणि त्यातून उद्भवलेली ही हिंसक घटना जेल प्रशासनासाठी देखील चिंतेचा विषय ठरली आहे.