भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्या आईविषयी काही विधानं केली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

धस यांच्या वक्तव्यानुसार, “धनंजय मुंडे आणि कराडच्या सोबतीला कंटाळून त्यांची आई परळी सोडून नाथरा गावी गेल्या.” यावर प्रत्युत्तर देत मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं –
“परळीतील आमच्या घराच्या नूतनीकरणासाठी आम्ही काही काळ नाथरा गावी राहतो आहोत. याआधी त्याच लोकांनी मला शेतातील घरात राहतो असं म्हटलं होतं, आता मात्र फक्त माझी आई राहते असा खोटा आरोप केला जात आहे. माझे चुलत भाऊ नेहमीच माझ्या सोबत खंबीरपणे उभे असतात, पण त्यांच्याबद्दलही चुकीचे दावे केले गेले.”
मुंडे पुढे म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप होत आहेत. आता कदाचित माझ्यावर आरोप करण्यासारखं काही उरलं नाही, म्हणूनच काही लोक माझ्या कुटुंबावर टीका करून नीच राजकारण करत आहेत. हा प्रकार अत्यंत खेदजनक आहे.”
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “माझ्या आरोग्यावर टीका, निंदा आणि शंका उपस्थित करण्यात आल्या, त्या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या. मात्र, माझ्या आईविषयी कोणीही खोटे आरोप केल्यास मी शांत बसणार नाही!”
धनंजय मुंडे यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.