बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने वाढत होती. अखेर ८२ दिवसांच्या तणावानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला आहे.

मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आणखी कठोर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मुंडे यांना हत्येच्या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी केली आहे. वाल्मिक कराड आणि त्यांच्या गटावर दाखल गुन्ह्यांमध्ये मुंडेंना सामील करावे, असा विरोधकांचा आग्रह आहे.
दरम्यान, मुंडे यांच्या समर्थकांमध्ये या निर्णयामुळे नाराजी निर्माण झाली आहे. परळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी हा राजीनामा चुकीचा असल्याचे म्हटले असून, एका नेत्याला कार्यकर्त्यांच्या कृत्यांची शिक्षा देणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या संपूर्ण घटनाक्रमामुळे राज्यातील राजकारण तापले असून, विरोधक आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.