सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत, महिलांवर अत्याचार करणाऱ्या सर्व मंत्र्यांना त्वरित पदावरून हटवावे, अशी मागणी केली आहे. त्या लवकरच या मुद्द्यावर आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

करुणा शर्मा यांनी नमूद केले की, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप समोर आले आहेत. तसेच, मधुकरराव पिचड यांच्या सुनेनेही आपल्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती आणि तिला प्रचंड अन्याय सहन करावा लागल्याचे सांगितले होते. अशा अनेक मंत्र्यांवर, आमदारांवर आणि खासदारांवर महिलांविरोधातील गंभीर आरोप आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक कारवाई करत संबंधितांची पदे रद्द करावी, अशी त्यांची मागणी आहे.
राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारने महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. या संदर्भात लवकरच पीडित महिलांसह सरकारकडे ठोस मागणी करण्यात येईल, असे करुणा शर्मा यांनी स्पष्ट केले.