राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

का घेतला हा निर्णय?
हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आमदार आहेत, मात्र त्यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. कोल्हापूर ते वाशिम हा सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास असल्याने त्यांना जिल्ह्यातील जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण जात होते. सततच्या प्रवासामुळे त्यांचा मतदारसंघ कोल्हापूरकडे लक्ष देता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे काय होणार?
महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदांचे वाटप अद्यापही सुरूच आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांबाबत अजूनही वाद सुरू आहे. अशातच हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानंतर वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाेकडे जाईल याकडे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे हे पद सोपवले जाण्याची शक्यता आहे. मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
महायुती सरकारपुढील नवीन आव्हान
हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकारमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. आधीच पालकमंत्री पदांचे वाटप पूर्ण झालेले नाही आणि यामध्ये आणखी बदल होत असल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
आता वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.