समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल दिलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानभवन परिसरात त्यांनी औरंगजेबाचा गौरव करत, तो एक कुशल प्रशासक होता आणि त्याने अनेक मंदिरे बांधली असल्याचे म्हटले. तसेच, संभाजी महाराजांनी कधीही धर्माच्या मुद्द्यावर युद्ध लढले नाही, असा दावा त्यांनी केला.

या वक्तव्यावर राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विविध ठिकाणी आंदोलनं झाली असून, आझमींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे विधान समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप केला जात आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांनी यावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे. लांडगे म्हणाले, “त्यांचा भूतकाळ पाहता, त्यांचे आतंकवादी गटांशी संबंध असल्याचे दिसून येते. अशा व्यक्तीने संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हे गंभीर आहे. त्यांचा डीएनए औरंगजेबासारखाच वाटतो.”
आझमी यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.