महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून, अखेर शिवसेना (ठाकरे गट) कडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. लवकरच पक्षाकडून अधिकृत पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आदित्य ठाकरे ऐवजी भास्कर जाधव यांची निवड
यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अनेक तज्ज्ञांनी त्यांना या पदासाठी संभाव्य उमेदवार मानले होते. मात्र, पक्षाने अनुभवी आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या भास्कर जाधव यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि आक्रमक शैलीचा सभागृहात फायदा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीचा प्रभाव आणि विरोधकांची भूमिका
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 232 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाची ताकद कमी असली तरी, भास्कर जाधव सभागृहात आक्रमक भूमिका घेत भाजप सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते कोण?
दरम्यान, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील हे प्रमुख दावेदार असल्याचे समजते. त्यामुळे विधानसभेत भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे नेतृत्व सतेज पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव यांच्या निवडीने ठाकरे गटाने आपल्या रणनीतीबाबत स्पष्ट संकेत दिले असून, आगामी राजकीय घडामोडींत त्यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.