शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी हा प्रकार औरंगजेबाने संभाजी महाराजांवर केलेल्या क्रूरतेसारखाच असल्याचे सांगितले.

राऊत म्हणाले, “संतोष देशमुख यांच्या हत्येतील राजकीय हस्तक्षेप आणि निर्दयता हे महाराष्ट्राच्या इतिहासातील काळे पान आहे. त्यांच्या मृत्यूचा खेळ काही नेत्यांनी केला. पोलिसांनी जप्त केलेले व्हिडीओ आणि फोटो पाहून महाराष्ट्रात किती अमानुष घटना घडत आहेत, हे स्पष्ट होते.”
यावेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप केले. “या प्रकरणातील आरोपी हे मुंडे यांच्या जवळचे आहेत. निवडणुकीत बुथ पातळीवर मतदारांना धमकावून विजय मिळवण्यात आला. जर त्यावेळीच ही निवडणूक रद्द झाली असती, तर आज संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “सरकार काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री जर न्यायप्रिय असतील, तर त्यांनी राज्यात कोणीही कायद्याचा गैरवापर करणार नाही, याची जबाबदारी घ्यावी.”
संतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून आवाज उठवला जात आहे.