मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. या अमानवीय घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, सर्व स्तरांतून तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

या प्रकरणावरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही कठोर कारवाईची मागणी केली होती. अखेर, या वाढत्या दबावामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या राजीनाम्याची घोषणा करत, तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
“देवाची काठी लागत नाही, पण न्याय मिळतो” – सुरेश धस यांची प्रतिक्रिया
भाजप आमदार सुरेश अण्णा धस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “देवाची काठी लागत नाही, पण न्याय मिळतो.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली, त्यामुळेच आज न्याय मिळाल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या एका जुन्या भाषणाचा संदर्भ घेत सांगितले की, “वाल्मिक कराड यांच्या परवानगीशिवाय धनंजय मुंडे यांचे काहीच चालत नाही,” असा त्यांचा दावा होता. मग संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी धनंजय मुंडे यांचा संबंध नव्हता, असे कसे म्हणता येईल? असा सवाल धस यांनी उपस्थित केला.
खंडणीप्रकरणी धनंजय मुंडेंवर नव्या चौकशीची मागणी
सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध खंडणीशी जोडत, या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी असा आरोप केला की, “सातपुडा बंगल्यावर खंडणीसंदर्भात बैठक झाली होती का?” याचे उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावे.
ते मंत्री राहिले किंवा नाही, तरी त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल, असे धस यांनी ठामपणे सांगितले. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी केली.
राजकीय वातावरण तापले, पुढील कारवाईकडे लक्ष
संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता धनंजय मुंडेंवरील आरोप आणि संभाव्य चौकशीमुळे हे प्रकरण आणखी गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील घटनाक्रमावर सर्वांचे लक्ष लागले आहे.