बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 82 दिवस उलटून गेल्यानंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या खासगी सहायकाने हा राजीनामा सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला असल्याची माहिती दिली.

आदित्य ठाकरे आक्रमक, सरकार बरखास्त करण्याची मागणी
या घटनेनंतर विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती नव्हती का? राज्यातील एका सरपंचाला न्याय मिळू शकत नाही, हे दुर्दैवी आहे. जर सरकार स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही न्याय देऊ शकत नसेल, तर ते बरखास्त करायला हवे,” असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि राजकीय हालचाली
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. यानंतर, CIDच्या दोषारोपपत्रासह काही फोटो आणि व्हिडिओ नुकतेच समोर आले, ज्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला होता. मात्र, सुरुवातीला सरकारने मुंडे यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, नवीन पुरावे समोर आल्यानंतर, काल रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले.
महायुतीच्या नेत्यांकडूनही टीका
हा विषय केवळ विरोधकांनीच उचलून धरलेला नाही, तर महायुतीतील काही नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले, “गुन्हेगारीचा उच्चांक गाठणाऱ्या वाल्मिक कराडला त्वरित कठोर शिक्षा झाली पाहिजे. सामान्य नागरिकांसाठी न्याय मिळवण्याच्या लढ्यात आम्ही कायमसोबत आहोत.”
राजकीय वातावरण तापले असताना, सरकार पुढे या प्रकरणावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.