पुणे: स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणा गावाचा रहिवासी आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. अखेर, पोलिसांनी त्याला त्याच्याच गावातून अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

या घटनेवर आरोपीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरोपीचा भाऊ सांगतो की, प्रसारमाध्यमांमुळे गावकऱ्यांना दत्ताच दोषी वाटतो, मात्र मीडियाने त्याची बाजूही ऐकायला हवी. तसेच, आम्हाला गावात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे त्याने सांगितले.
आरोपीच्या पत्नीचा दावा
दत्ता गाडेच्या पत्नीनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. तिच्या मते, घटनेच्या वेळी दत्ता भाजी विकून घरी परतत होता आणि जे काही घडले ते संमतीने झाले. तिने न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले आणि प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली.
सध्या पोलिस तपास सुरू असून या प्रकरणात काय सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.