केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताई यात्रेदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे उत्तर
या प्रकरणात सहभागी आरोपी शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मौन सोडत स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जो कोणी दोषी असेल, त्याला मी पाठिशी घालणार नाही. तो माझा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी द्या.”
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात पियूष मोरे, अनिकेत भोई, सोम माळी, अतुल पाटील आणि किरण माळी या पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
राजकीय वातावरण तापले
संशयित आरोपी पियूष मोरे हा शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. तो पूर्वी भाजपमध्ये होता, मात्र नंतर शिवसेनेत दाखल झाला. या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले, त्यामुळे शिंदे गटासाठी हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश
रक्षा खडसे यांनी सांगितले की, “पोलीस सुरक्षेसोबत असतानाही हा प्रकार घडला, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.”
याशिवाय, रक्षा खडसे आणि आरोपी पियूष मोरे यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, मात्र तिची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.