पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तातडीने बैठक घेतली आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळात आता आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

स्वारगेट प्रकरणानंतर सुरक्षेवर भर
गेल्या आठवड्यात स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मंत्री माधुरी मिसाळ यांनी आज स्वारगेट बसस्थानकाला भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.
सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार
मिसाळ यांनी बसस्थानक परिसरातील सुरक्षा रक्षकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एसटी महामंडळात सुरक्षेसाठी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या निर्णयामुळे बसस्थानकांवरील सुरक्षेची स्थिती सुधारली जाईल आणि अशा घटनांना आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयानंतर राज्यभरातील एसटी बसस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट केली जाईल, अशी शक्यता आहे.