सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुंडेंना माध्यमांनी बीडमधील घटनेबाबत विचारणा केली असता, त्यांनी पत्रकारांना सुनावत, “मी पुण्यात आहे, तुम्ही पुण्याचे प्रश्न विचारा. पुण्यात एका मुलीवर बलात्कार झाला, तो प्रश्न का विचारत नाही?” असे उत्तर दिले.

यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंना खोचक सवाल केला. त्या म्हणाल्या, “तुम्ही बीडमधल्या आहात, परळीला राहता. मग बीडमधील प्रश्न तुम्हालाच विचारणार ना? तुम्ही अमेरिकेत गेलात, तर तिथे तुम्हाला ट्रम्पविषयी विचारणार का?”
दमानिया यांनी पुढे स्पष्ट केले की, एका लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघातील प्रश्नांना उत्तर देणे गरजेचे आहे. मात्र, त्यावरून पत्रकारांना फटकारणे योग्य नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.