राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयाचे कौतुक केले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेसाठी 3200 कोटी रुपयांचे टेंडर रद्द करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आणि याबाबत ट्वीट करत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

“भ्रष्टाचार जगजाहीर आहे!”
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये मागील सरकारमधील भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “मागील सरकारमध्ये काही भ्रष्ट मंडळींनी आरोग्य खात्याचा वापर लोकांच्या सेवेसाठी न करता दलालीसाठी केला. सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेसाठी यंत्रणा बसवण्याच्या नावाखाली तब्बल 3200 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते, जे अवाजवी होते. त्यामुळे हा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
“अँब्युलन्स खरेदीतील घोटाळ्याचीही चौकशी करा!”
यासोबतच, रोहित पवार यांनी मागील सरकारमध्ये अँब्युलन्स खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “फक्त टेंडर रद्द करून चालणार नाही, तर ‘भ्रष्टाचाराच्या खेकड्या’ने खाल्लेली दलाली व्याजासह परत वसूल करावी.”
“राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांना धडा शिकवा!”
पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये आणखी एक मोठा दावा करत म्हटले, “मागील सरकारच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण फाईल जोडत आहे. याची सखोल चौकशी करून राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली तर भविष्यात कुणीही असे करण्याची हिंमत करणार नाही.”
भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांनी सरकारला पुढील पाऊल उचलण्याची विनंती केली आहे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.