पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिलांनी अनोखे आंदोलन करत बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिला जागर समितीच्या वतीने ‘तिरडी आंदोलन’ करण्यात आले, ज्यामध्ये त्यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला आणि आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

आरोपीस फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दत्तात्रय गाडे याला फाशी देण्यात यावी, अशी महिलांची ठाम मागणी आहे. या आंदोलनाद्वारे त्यांनी न्यायसंस्थेकडे आरोपीवर कठोर कारवाईची विनंती केली.
राज्य गृहराज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध
याचवेळी, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही महिलांनी संताप व्यक्त केला. “त्या घटनेत प्रतिकार, आरडाओरड काहीच झाले नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी पीडितेच्या वर्तनावरच प्रश्न उपस्थित केला होता. या विधानावरून त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली असून महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार किती गंभीर आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महिलांची असुरक्षिततेबाबत चिंता
आंदोलनादरम्यान महिलांनी जोरदार घोषणा देत आजही समाजात स्त्रिया सुरक्षित नसल्याचे सांगितले. पुण्यातील या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेबाबत नवे प्रश्न उभे केले असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.