बीडच्या कारागृहात आरोपी वाल्मीक कराडला विशेष वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रशासनावर टीका करत ही बाब उघड केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज लपवले जात असल्याचा आरोप
वाल्मीक कराडला तुरुंगात चहा, नाश्ता आणि विशेष जेवण पुरवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच, तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेरे मुद्दामहून बंद ठेवले जात असल्याचे आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केले आहेत. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांनी कारागृह प्रशासनाकडे वाल्मीक कराडच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे.
“मंत्री धनंजय मुंडेंमुळेच विशेष वागणूक” – विजय वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, “वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. जर मंत्र्यांच्या सहकाऱ्यांना VIP वागणूक मिळणार नसेल, तर मग कोणाला मिळणार?”
“खून करावा तरी वाल्मीकनेच” – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही कठोर शब्दांत टीका करत म्हटले, “कराडला तुरुंगात मालिशसह विशेष जेवण पुरवले जात आहे. खून करावा तरी वाल्मीकने आणि सुखात जगायचेही त्यानेच, आपण वेडे आहोत का?”
अंजली दमानियांचा गंभीर आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. “तुरुंगातील सीसीटीव्ही मुद्दामहून बंद करून कराडला विशेष सेवा पुरवली जाते. हा सरळसरळ नियमांचा भंग आहे,” असे त्यांनी सांगितले.
वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या कथित VIP वागणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधक सरकारवर टीका करत आहेत. आता प्रशासन या आरोपांवर काय स्पष्टीकरण देते आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.