बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सीआयडीच्या पथकाने या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात तब्बल 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या विरोधातदेखील सखोल चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे केला असून, संपूर्ण केसचा तपशील आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.
सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी तसेच अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली हे यासाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष सरकारी वकील उज्वल निकम या प्रकरणाची पुढील न्यायालयीन प्रक्रिया हाताळणार आहेत.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय त्याची छाननी करून पुढील कार्यवाहीला मंजुरी देईल. त्यानंतर आरोपी आणि त्यांच्या वकिलांना हे आरोपपत्र अभ्यासासाठी दिले जाईल. पुढील टप्प्यात या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल.
ही केस लक्षवेधी ठरणार आहे, कारण तपास यंत्रणांनी यात अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आता न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणाला कोणती दिशा मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.