पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घेतली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी दोषींना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून कठोर कारवाईचे निर्देश
या धक्कादायक घटनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला सुरक्षेसाठी सरकारची पुढाकार
महिलांना एसटी प्रवासात ५०% सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मात्र त्यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अधिक उपाययोजना केल्या जातील, असेही शिंदे यांनी नमूद केले.
फाशीची शिक्षा आणि कठोर कायदे?
अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायदे अधिक प्रभावी बनवण्याची गरज आहे, असा ठाम पवित्रा घेत ‘सरकार न्यायासाठी लढेल आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करेल’, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
जनतेतून तीव्र संताप
या घटनेनंतर समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिक महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदे आणि अंमलबजावणीची मागणी करत आहेत. सरकारच्या पुढील निर्णयांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.