पुण्यातील स्वारगेट बस डेपोतील धक्कादायक घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी कारवाई करत सुरक्षेतील निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी तातडीने २३ सुरक्षारक्षकांना निलंबित केले आहे.

नवीन सुरक्षा व्यवस्था लागू करण्याचे आदेश
या सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केल्यानंतर डेपोमध्ये नवीन सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यासोबतच, परिवहन विभागाच्या नियंत्रक आणि डेपो व्यवस्थापकांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आठवडाभरात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी कडक नियम लागू होणार
घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम आणखी कठोर करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, तसेच जुनी व निष्क्रिय पडलेली वाहने हटवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे, जिथे पुढील निर्णय घेतले जातील.