शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातही नाराजीचा सूर उमटत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा असून, आता गोऱ्हेंनी स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पक्षातून होत आहे.

नीलम गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंना भेटणार
सूत्रांच्या माहितीनुसार, नीलम गोऱ्हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून या प्रकरणावर चर्चा करणार आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत वादग्रस्त विधान केले होते. “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं,” असा गंभीर आरोप करत त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली.
ठाकरे गटाचा संताप आणि प्रत्युत्तर
या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून, त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी त्यांच्यावर जहरी टीका करत त्यांना “निर्लज्ज आणि विश्वासघातकी” असे संबोधले. तसेच, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंना थेट आव्हान दिले – “उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप कोर्टात सिद्ध करा, नाहीतर नाक घासून माफी मागा.”
या संपूर्ण प्रकरणामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत तणाव निर्माण झाला असून, पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.