राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली. त्यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात शाही स्नानही केले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयागराज दौऱ्यावर गेले होते. मात्र, शिंदे यांच्या या धार्मिक यात्रेवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले की, गेल्या अडीच वर्षांत त्यांनी मोठे पाप केले आहे, आणि त्याचा परिपाक म्हणूनच ते प्रयागराजला पाप धुण्यासाठी गेले आहेत. त्यांनी शिंदे गटाच्या निर्णयांवर आणि त्यांच्या राजकीय कारभारावरही कठोर शब्दांत टीका केली.
संजय राऊतांचे टीकास्त्र
राऊत म्हणाले की, समर्थ रामदास स्वामींनी मूर्खांची १० लक्षणे सांगितली आहेत आणि ती सर्व लक्षणे शिंदे यांच्या गटात दिसत आहेत. त्यांनी शिंदे यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप करत म्हटले की, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या लोकांना भरभरून दिले, पण आता तेच विश्वासघात करत आहेत.
‘शिंदेंचा पक्ष हा अमित शहांचा पक्ष’
राऊतांनी दावा केला की, शिंदेंचा पक्ष हा प्रत्यक्षात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पक्ष आहे. त्यांनी असा आरोप केला की, राज्यातील अनेक फिक्सर आणि दलाल शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून पुढे पाठवले जात आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले की, त्यांनी काही गैरव्यवहार रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
‘शिंदे प्रयागराजला पाप धुण्यासाठी गेले’
राऊत म्हणाले की, अजित पवार यांनी प्रयागराजला जाणे टाळले कारण त्यांना माहिती आहे की, महाराष्ट्रातील नद्याही पवित्र आहेत. मात्र, शिंदे गटाने अडीच वर्षांत इतके पाप केले आहे की, त्यांना प्रयागराजच्या संगमात स्नान करून ते धुण्याची गरज भासली.
‘फडणवीसांचे निर्णय योग्य’
राज्यातील आर्थिक अराजकता आणि टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचारावरही राऊतांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, टेंडर निघण्याआधीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जात होते, पण फडणवीसांनी यात हस्तक्षेप करून काही निर्णय रद्द केले. त्यामुळे त्यांनी राज्याच्या हिताचा विचार केला आहे, असे राऊतांचे म्हणणे आहे.