राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावत, “सकाळी ९ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद शिकवला तर संवादाची स्थिती सुधारेल,” असे वक्तव्य केले आहे.

नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात फडणवीस यांनी संवादाच्या महत्त्वावर भर दिला. “कोणीही कोणाशीही सुसंवाद करत असेल, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. विसंवाद टाळून संवाद वाढला पाहिजे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाविषयी गंभीर आरोप केले. “शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या,” असे धक्कादायक विधान त्यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी गोऱ्हेंवर तीव्र शब्दांत टीका केली आणि त्यांना “निर्लज्ज आणि विकृत” असे संबोधले.
यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गोऱ्हेंवर टीका करत त्यांना “नमकहराम” असे म्हटले. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये नव्याने संघर्ष पेटला आहे.
या वादावर भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देत महिलांविषयी अशा प्रकारच्या टिप्पणी टाळाव्यात, असे सांगण्यात आले आहे. राजकीय नेत्यांमधील हे आरोप-प्रत्यारोप सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.