राजकीय वर्तुळात सध्या नीलम गोऱ्हे यांच्या एका आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. गोऱ्हे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत, “शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळतं,” असा सनसनाटी दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गोऱ्हेंवर जोरदार टीका करत त्यांना “निर्लज्ज” आणि “विश्वासघातकी” असे संबोधले. याच दरम्यान, राऊतांनी आणखी एक दावा केला की, नीलम गोऱ्हे तिकीट मिळवून देण्यासाठी पैसे घेत होत्या. त्यांनी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि पुणे महानगरपालिकेचे माजी गटनेते अशोक हरनावळ यांची नावे घेतली आणि त्यावर शिक्कामोर्तब केले.
या आरोपांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील संताप अधिकच वाढला. नेत्या सुषमा अंधारे यांनीही गोऱ्हेंवर हल्लाबोल करत, “चार वेळा विधानपरिषद आमदारकी दिली, मग किती मर्सिडीज दिल्या?” असा थेट सवाल केला.
या संपूर्ण वादावर आता पुढे काय प्रतिक्रिया येतात आणि गोऱ्हेंच्या आरोपांवर ठाकरेंची शिवसेना अधिकृतपणे काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.