पुण्यातील कोथरूड येथे संगणक अभियंता आणि भाजप कार्यकर्ते देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात कुख्यात गुंड गजा मारणे याला अखेर अटक करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी मारणे टोळीविरोधात कारवाईचा वेग वाढवला होता.

पोलिसांची कठोर भूमिका
घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कठोर कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी टोळीतील तिन्ही आरोपींना आधीच अटक केली असून, मुख्य सुत्रधार गजा मारणे यालाही शोध घेऊन पकडण्यात आले आहे.
गुन्हेगारीवर पोलिसांचा आघात
टोळीतील ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ आणि अमोल विनायक तापकिर यांना पोलिसांनी अटक केली असून, चौथा आरोपी श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार अद्याप फरार आहे. टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न आणि मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दहशतवाद संपवण्यासाठी कठोर पावले
पोलिसांनी टोळीच्या मालमत्तेचा तपास सुरू केला असून, आरोपींच्या वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेतली जात आहे. पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव संपवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, पुढील काळात अशा गुन्हेगारी टोळ्यांविरोधात अजून कडक कारवाई केली जाणार आहे.