मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या महादजी शिंदे पुरस्कारावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. यावर आता शरद पवार यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली. संजय राऊत यांनी या विषयावर केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, “मी कुणाचा सत्कार करायचा आणि करायचा नाही, यासाठी परवानगी घ्यावी लागत असेल, तर ते लक्षात ठेवेन.” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पवार पुढे म्हणाले, “संजय राऊत यांनी हा विषय उपस्थित केला, त्यात काही चुकीचं नाही. एका संस्थेने हा पुरस्कार आयोजित केला होता आणि मी त्यामध्ये सहभागी झालो. त्या सोहळ्यात एकनाथ शिंदेंसह एकूण १५ जणांचा सत्कार झाला. मात्र, माध्यमांनी केवळ शिंदेंच्या नावावरच लक्ष केंद्रीत केले. हा पुरस्कार कोणत्याही राजकीय संघटनेने दिलेला नाही, तर दिल्लीतील मराठी लोकांनी तो प्रदान केला आहे.”
पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.