नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. गोऱ्हेंच्या मते, शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यास पद मिळते. या वक्तव्यामुळे ठाकरे गटात मोठा संताप उसळला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी दावा केला की, नीलम गोऱ्हेंनी त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि १००% तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याऐवजी अजय बोरस्तेला तिकीट देण्यात आले. पांडे पुढे म्हणाले की, “मी शहरप्रमुख, उपमहापौर झालो, पण उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून एक रुपयाही मागितला नाही. त्यामुळे अशा गोष्टी त्यांच्या नेतृत्वाखाली घडत नाहीत.”
पांडे यांनी नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप करताना विचारले की, “त्या पैशांचं पुढे काय झालं? ते कुणाकडे गेले?” मात्र, त्यांना या बाबत ठोस माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंपर्यंत ही माहिती पोहोचते का नाही, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
तसेच, “अनेक नेते पुढे येतील आणि सत्य समोर येईल. पैशांच्या व्यवहाराशिवाय कार्यकर्त्यांना संधी मिळू देत नाही, हे वास्तव आहे,” असे सांगत त्यांनी नीलम गोऱ्हेंवर थेट आरोप केले.
या प्रकरणामुळे शिवसेनेत अंतर्गत गटबाजी अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होत आहे.