मुंबईवरील 26/11 च्या भयावह दहशतवादी हल्ल्याचा एक महत्त्वाचा सूत्रधार तहव्वूर राणा सध्या भारतात तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. त्याच्याशी संबंधित एक नवीन आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली असून, एका रहस्यमय महिलेसोबत तो भारतभर फिरल्याचे उघड झाले आहे. आता ‘ती’ महिला नेमकी कोण होती, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे.

राणाच्या सोबत दिसलेली ‘ती’ महिला
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणा भारतात असताना एक महिला त्याच्या सतत संपर्कात होती. उत्तर प्रदेशमधील आग्रा, हापूड तसेच दिल्ली या भागांमध्ये ती महिला राणासोबत अनेक ठिकाणी गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ही महिला कोण होती आणि तिचा राणाशी नेमका काय संबंध होता, हे स्पष्ट होणं महत्त्वाचं ठरतंय.
पत्नी की साथीदार?
राणाने चौकशीत या महिलेला त्याची पत्नी म्हणून संबोधल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, एनआयएच्या अधिकाऱ्यांना हे संशयास्पद वाटले असून, ती खरोखरच पत्नी होती की मिशनमध्ये सहभागी दुसरीच व्यक्ती, याचा तपास सध्या सुरू आहे. त्याचवेळी ती महिला सध्या कुठे आहे, याचाही शोध घेतला जातोय.
हल्ल्याआधी ‘रेकी’ची शक्यता
तहव्वूर राणाने मुंबईवरील हल्ल्याच्या अगोदर, 13 नोव्हेंबर 2008 ते 21 नोव्हेंबर 2008 या कालावधीत भारतातील विविध शहरांना भेट दिली होती. त्यावेळी ही महिला त्याच्यासोबत होती. त्यामुळे ती केवळ सहचारी नव्हती, तर हल्ल्याच्या नियोजनात तिची भूमिका होती का? हे सुद्धा तपासाच्या केंद्रस्थानी आलं आहे. एनआयए याच संदर्भात राणाला देशातील विविध ठिकाणी नेऊन चौकशी करण्याच्या तयारीत आहे.
आर्मीच्या ड्रेसचा फॅन
राणाच्या चौकशीत आणखी एक रंजक बाब समोर आली आहे. त्याला लष्करी गणवेशाचे विलक्षण आकर्षण असल्याचं निदर्शनास आलं आहे. तो लष्करातून निवृत्त झाल्यानंतरही आर्मीचा ड्रेस घालायचा. दहशतवादी बैठकीतही तो लष्करी गणवेशातच जात असल्याची माहिती तपास यंत्रणांनी उघड केली आहे. त्याचा एक भाऊ पत्रकार आहे, हे देखील या चौकशीत समोर आले आहे.