2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या आरोपी तहव्वुर राणाला भारतात प्रत्यार्पित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून, सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये बंदिवान आहे. तो डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी मानला जातो, जो 26/11 च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. राणावर देखील या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
तहव्वुर राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करत आपले भारतात प्रत्यार्पण होऊ नये, अशी विनंती केली होती. त्याने आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला होता की, भारतात त्याच्यावर धर्म आणि राष्ट्रीयतेच्या आधारावर छळ होऊ शकतो. तसेच, त्याचे प्रत्यार्पण हे अमेरिकेच्या कायद्याचा तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अत्याचारविरोधी कराराचा भंग असल्याचेही त्याने नमूद केले होते.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यक न्यायमूर्ती एलेना कागन यांनी सुनावणी केली आणि ती फेटाळून लावली. यानंतर राणाने पुन्हा एकदा नव्या अर्जासह न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, मात्र 4 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीनंतर हा अर्जदेखील अमान्य करण्यात आला.
या निर्णयामुळे भारताने राणाच्या प्रत्यार्पणासाठी केलेले दीर्घकालीन प्रयत्न आता यशस्वी होण्याच्या दिशेने आहेत. एकदा भारतात आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर 26/11 हल्ल्याशी संबंधित गुन्ह्यांबाबत न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाणार आहे.