राजकारणाच्या विश्वात कोणतीही गोष्ट निश्चित नसते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा करत सांगितले की, २०२९ मध्ये आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांच्या या विधानामुळे राज्यात राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

“मैदान अजून शिल्लक आहे, आम्ही पुन्हा येणार आहोत!” – असं खैरे यांनी ठणकावून सांगितलं. जालना जिल्ह्यात एका वैवाहिक कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत ही भविष्यवाणी केली.
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावरही खैरे यांनी कठोर शब्दांत टीका केली. दानवे यांनी याआधी “शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत टिकणार नाही” असं वक्तव्य केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना खैरे म्हणाले की, “दानवे यांनी माझ्या पराभवासाठी भाजपच्या नगरसेवकांसोबत आमच्या लोकांनाही पैसे दिले, पण २०२४ मध्ये देवाने त्यांना पराभवाची चव चाखवली.”
तसंच, त्यांनी दानवे कुटुंबीयांवरही अप्रत्यक्ष हल्ला चढवला – “एकाच घरात महायुतीनं दोन तिकीटं दिली. एकीकडे मुलगा, दुसरीकडे मुलगी – हे कुठल्या न्यायाने?” असा सवाल त्यांनी केला.
खैरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवर नव्याने लक्ष केंद्रीत होणार आहे हे नक्की. आदित्य ठाकरे खरोखरच मुख्यमंत्री होणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.