राजकारणात कुरघोड्यांचे वाद नेहमीच पाहायला मिळतात. अलीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत, “शिंदे गटाचे खरे प्रमुख अमित शाह आहेत,” असा खोचक टोला लगावला होता. या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चांगलाच पलटवार केला आहे.

शिरसाट म्हणाले, “होय, अमित शाह हेच आमचे पक्षप्रमुख आहेत आणि आम्ही त्यांचं नेतृत्व मानतो. त्यात तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातच पुढे जात आहोत.” त्यांनी हे वक्तव्य पत्रकारांशी संवाद साधताना केलं.
“राहुल गांधीसोबत गळाभेट करणारे आम्ही नव्हे”
संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना शिरसाट म्हणाले, “आम्ही तरी कधी काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधींची गळाभेट घेतली का? आमचं नेतृत्व स्पष्ट आहे – मोदी आणि शाह!”
“मदत घेतली, तर त्यात गैर काय?”
राज ठाकरे यांच्याशी झालेल्या एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केलं, “संपर्क ठेवणं हे नेतृत्वाचं लक्षण आहे. ताकद वाढवण्यासाठी जर इतरांची मदत घेतली, तर त्यात वावगं काय?” त्याचवेळी त्यांनी उदय सामंत यांच्यावरही विश्वास व्यक्त केला.
“ठाकरे गटाचा निर्धार मेळावा की पक्ष बचाव मेळावा?”
नाशिकमध्ये होणाऱ्या ठाकरे गटाच्या मेळाव्यावर टीका करत शिरसाट म्हणाले, “हा निर्धार मेळावा नाही, तर पक्ष वाचवण्यासाठीचा प्रयत्न आहे. ज्यांच्यामुळे पक्षाची पीछेहाट झाली, त्यांना बाजूला ठेवलं जातंय.”
“नाशिकमध्येच होईल विसर्जन”
शिरसाट यांनी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्याबद्दलही टोमणे मारले. “अंधारे यांना वाटतं, पक्ष त्यांनीच उभा केला आणि जाधव यांचं काय, ते पक्षात राहतील का, हेच ठरलेलं नाही,” असं म्हणत त्यांनी या गटाचं भविष्यही नाशिकमध्येच ठरेल, असा इशारा दिला.
“अन्याय झाला, तर आवाज उठवूच”
महायुतीतील असंतोषावर भाष्य करताना शिरसाट यांनी ठाम भूमिका मांडली. “आमच्यावर अन्याय झाला, तर आम्ही गप्प बसणार नाही. आंबेडकर जयंतीसाठीचा कार्यक्रम ठरलेलाच आहे,” असंही ते म्हणाले.
“पाटीलकीच्या वादात सामान्य शिवसैनिक भरडतोय”
खैरे आणि दानवे यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर शिरसाट यांनी खंत व्यक्त केली. “या दोघांमध्ये पाटीलकी कोणाकडे, हेच ठरत नाही. आणि यात सामान्य कार्यकर्ता भरडला जातो,” असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.