सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेच्या वादाला चांगलाच उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याची चूक स्पष्टपणे मान्य केली आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना त्यांनी हिंदीला ‘राष्ट्रभाषा’ म्हटले होते, मात्र आता त्यांनी ती चूक मान्य करत हिंदी ही ‘राजभाषा’ आहे असे स्पष्टीकरण दिले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “काल बोलताना मी चुकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हटले. खरंतर मला राजभाषा म्हणायचे होते. हिंदी ही भारताची राजभाषा आहे, राष्ट्रभाषा नाही. माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला आणि त्यावर काही लोकांनी टीकाही केली.”
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यात हिंदी सक्तीला विरोध करत तीव्र भूमिका घेतली आहे. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी देखील इशारा दिला की, या मुद्द्यावरून संघर्ष तीव्र होईल.
बावनकुळे यांनी पुढे स्पष्ट केले की, “मराठी अस्मिता आणि मराठी भाषेबाबत आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. मराठी आमची अभिमानाची भाषा आहे. मात्र देशाच्या विविध भागात फिरताना हिंदी ही एक कॉमन भाषा म्हणून उपयुक्त ठरते. उत्तर प्रदेश, बिहार किंवा देशाच्या इतर राज्यांमध्ये व्यवहार मुख्यतः हिंदीत होतो.”
त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत सांगितले की, “जर अभ्यासक्रमात हिंदी विषय आलेला असेल, तर त्यावरून मोठे राजकारण करणे किंवा आंदोलन उभारणे योग्य नाही. देशातील सुमारे ६० टक्के राज्यांमध्ये सरकारी व्यवहार हिंदीतच होतो.” बावनकुळे यांनी हेही सांगितले की, प्रत्येकाने हिंदी भाषा शिकावी, परंतु त्याच वेळी आपल्या मातृभाषेचा अभिमानही टिकवावा.
शेवटी त्यांनी हेही अधोरेखित केले की, विकासाच्या दिशेने देश पुढे चालला असताना काही लोक मुद्दाम अशा विषयांवरून वाद निर्माण करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात.
या सर्व घडामोडींमुळे राज्यातील भाषावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण तापले आहे. मराठी अस्मिता आणि हिंदीच्या भूमिकेवरून पुढील काही दिवसांत आणखी चढाओढ होण्याची शक्यता आहे.