पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एकामागोमाग एक धक्कादायक घटनांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली होती. त्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 13 पथके तैनात केली आहेत. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

या घटनेचे पडसाद अजूनही उमटत असतानाच, स्वारगेट बस स्थानकात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला कंडक्टरच्या तिकीट विक्रीतून गोळा झालेल्या 30 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
कसे घडली चोरी?
महिला वाहक सातारवरून पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आली होती. स्वारगेट आगारात पोहोचल्यावर ती थोडा वेळ फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. मात्र परत आल्यावर तिला धक्का बसला—तिची पैशांची बॅग गायब झाली होती.
त्यावेळी बसमधील बहुतांश प्रवासी उतरले होते, मात्र 3-4 जण अजूनही बसमध्येच होते. संशय आहे की, त्याच प्रवाशांपैकी कुणीतरी पैशांची बॅग लंपास केली असावी. या घटनेनंतर संबंधित महिला कंडक्टरने डेपो प्रशासनाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा आरोपी अद्याप फरार
दरम्यान, शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याच्या अटकेसाठी मोठे प्रयत्न सुरू असून, तो शिरूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कुणाला त्याच्याबाबत काहीही माहिती मिळाली, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपीला पकडून देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
स्वारगेट बस स्थानकात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे प्रवासी आणि कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.