पुण्यातील स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरणावर गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “योगेश कदम यांनी दिलेले विधान वेगळ्या संदर्भात घेतले गेले. ते फक्त सांगत होते की, हे ठिकाण वर्दळीचे असूनही घटना घडली, त्यामुळे लोकांना समजले नाही. योगेश कदम हे नवीन मंत्री आहेत आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा संवेदनशील प्रकरणांवर बोलताना अधिक काळजी घ्यावी लागते.”
त्यांनी पुढे सांगितले, “मंत्री असो वा लोकप्रतिनिधी, संवेदनशील विषयांवर बोलताना जबाबदारीने बोलायला हवे. चुकीच्या वक्तव्यांमुळे समाजमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.”
विरोधकांचा आक्रमक पवित्रा
विरोधी पक्षाने मंत्री कदम आणि सावकारे यांच्या वक्तव्यांवर कडाडून टीका केली आहे. मंत्री योगेश कदम यांनी “पीडितेने स्ट्रगल केला नाही,” असे विधान केले होते, तर संजय सावकारे यांनी “अशा घटना फक्त पुण्यातच नाहीत, तर संपूर्ण देशभर घडतात,” असे सांगितले होते.
या दोन्ही विधानांवर संताप व्यक्त करत विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुद्द्यावर भाष्य करत मंत्र्यांना संयमी आणि जबाबदार वक्तव्य करण्याचा सल्ला दिला आहे.