पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या या भयंकर घटनेनंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्वारगेट बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर आवाज उठवत सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयावर तोडफोडही केली.

पीडित तरुणीचा वसंत मोरेंना फोन
या प्रकरणाचा पाठपुरावा करताना वसंत मोरे यांनी पीडित तरुणीशी 20 मिनिटं संवाद साधल्याची माहिती दिली. ते म्हणाले,
“माझ्या आणि पीडित तरुणीच्या मित्राचा मला फोन आला. मी तिला ऐकून घेतलं, पण ती खूप रडत होती. या प्रकरणात तिला सतत चौकशीसाठी बोलावलं जातंय. दररोज तिने तेच तेच सांगायचं, पुन्हा रडायचं, ही मानसिक त्रासाची गोष्ट आहे. दुसरीकडे, आरोपी मात्र सुरक्षितपणे तुरुंगात बसलेला आहे.”
पोलिसांवर गंभीर आरोप
वसंत मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की,
“7500 रुपये दिले असताना, पीडित तरुणीची बॅग 48 तास पोलिस ठाण्यातच होती. मग त्या वेळी का चौकशी करण्यात आली नाही? पोलिसांच्या कोणत्याही स्टेटमेंटमध्ये या पैशांचा उल्लेख नाही. याचा अर्थ काय?”
न्यायासाठी लढण्याचा निर्धार
या संपूर्ण प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा, पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकाराविरोधात ते लढत राहणार आहेत आणि पीडितेला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाहीत.