नाशिकमधील एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ‘सर्वधर्म समभाव’ या संकल्पनेवर टीका करत ती ‘नपुंसकपणा’ असल्याचं म्हटलं. “सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार ना धड स्त्री, ना धड पुरुष – म्हणजे नपुंसकपणा,” असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तिरंगा ध्वज स्वीकारला गेला, याचा उल्लेख करत भिडे म्हणाले की, “तिरंगा आणि संविधान मान्य आहे, पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांचा इतिहास असलेलं राष्ट्राचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने भगव्याचा अभिमान बाळगून 15 ऑगस्टला तिरंगा फडकवावा, आणि त्याचवेळी लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याच्या दिशेनेही प्रयत्न करावेत.”
याच कार्यक्रमात भिडे यांनी त्यांच्या जुन्या वादग्रस्त विधानाचा पुन्हा उल्लेख केला – “मी एकदा आंबा खाऊन मूल होतं असं म्हटलं होतं. त्या विधानावर सध्या माझ्यावर खटला सुरू आहे. मी स्वतः आंब्याचं झाड लावलं आहे आणि तिथे अजूनही आंबे लागतात,” असे ते म्हणाले.
इतक्यावरच न थांबता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे उल्लेख करत सांगितले की, “शिवाजी महाराज गायत्री मंत्राचा जप करत असत आणि मंत्र शक्तीचा लाभ ग्रहणाच्या काळात होतो. मृत्यूपूर्वी शिवाजी महाराजांनी ‘आमचा काळ झाला, सप्तसिंधू मुक्त करा’ हे शेवटचे शब्द उच्चारले,” असा दावा त्यांनी केला.
संभाजी भिडे यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असून, यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.