सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पोलिस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, चार्जशीटमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख नसल्याची शंका व्यक्त केली आहे.

चार्जशीटमध्ये पोलिसांची नावे का नाहीत?
अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, धनंजय मुंडे यांना या संपूर्ण कटाची कल्पना होती. त्यांच्या सांगण्यावरूनच अवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती, जिथे दोन पोलीस अधिकारी हजर होते. मात्र, या अधिकाऱ्यांचा उल्लेख चार्जशीटमध्ये नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
मुंडेंच्या प्रभावामुळे आरोपींना वाचवले जात आहे?
दमानिया यांनी आरोप केला आहे की, पोलिसांवर दबाव टाकून सत्य लपवले जात आहे. बालाजी तांदळे याने 9 तारखेपासून पोलिसांसोबत फिरून आरोपी शोधले होते. मात्र, हा तपास दुसऱ्या दिशेने वळवण्यासाठी आणि काही लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी टाकली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सहआरोपींची मागणी
दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यासह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यात सारंग आंधळे, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, बालाजी तांदळे, डॉ. वायबसे आणि गीते यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांवरही प्रश्नचिन्ह
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? जर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले असेल, तर सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि टॉवर लोकेशन यांची तपासणी का झाली नाही?” असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
या आरोपांमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता पोलिस तपास यामध्ये किती तथ्य आहे, हे स्पष्ट करेल.