राज्यातील खासगी कॅब सेवा कंपन्यांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारनं आता स्वतःचं ‘छावा राईड’ नावाचं मोबाईल ॲप सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्याचे परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून, या ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि बससेवेचं आरक्षण सहज करता येणार आहे.

ही घोषणा मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या समुच्चयक धोरणाच्या आधारे हे ॲप तयार करण्यात येत असून, अंतिम मसुद्यावर चर्चा झाली. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ ओला-उबरला पर्याय देणं नाही, तर राज्यातील स्थानिक मराठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं हाही आहे. या माध्यमातून एसटी महामंडळाच्या अधिकृत ॲपद्वारे हजारो तरुण-तरुणींना चालक म्हणून संधी मिळणार आहे.
गाडी खरेदीसाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सरकारने विशेष योजना आखली आहे. मुंबई बँकेमार्फत वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. त्यासोबतच विविध महामंडळांमार्फत ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे. त्यामुळे हे कर्ज जवळपास बिनव्याजी होणार आहे, अशी माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
‘छावा राईड’ या नावावर सर्वपक्षीय सहमती झाली असून, यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मान्यतेनंतर घेतला जाईल. लवकरच हे ॲप कार्यान्वित होणार आहे.
सरकारच्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर स्वस्त, विश्वासार्ह व सरकारी देखरेखीखाली चालणारी राईड सेवा निर्माण होणार असून, खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला सशक्त पर्याय मिळणार आहे.