राज्यातील राजकारण पुन्हा एकदा उलथापालथीच्या वळणावर असल्याचे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, मोठा स्फोट होणार आहे.” या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात एकापेक्षा एक मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीतच काही दिवस तळ ठोकून होते. त्याच दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते बदलण्यात आलं. या सगळ्या हालचालींवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “फडणवीस यांनी अमित शाह यांना सांगितलं आहे की मित्रपक्षांसोबत काम करणं अवघड झालं आहे.”
राऊत यांचा आणखी एक मोठा दावा म्हणजे, राज्यात सुरू असलेली व्यवस्था ही तात्पुरती आहे. त्यांनी म्हटलं की, “हे सरकार कलंकित झालं आहे. काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. वसई प्रकरणात 1000 कोटींचा घोटाळा आहे आणि त्यात एका मंत्र्याला जबाबदारी घ्यावी लागेल.” नव्या क्रीडामंत्र्यांवरही त्यांनी शंका व्यक्त केली.
याशिवाय राऊत म्हणाले, “मंत्र्यांचे खातेबदल हे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहेत. आरोपी मंत्र्यांना वाचवण्याचा हा डाव आहे. मात्र, जनतेवर याचा काहीच परिणाम होणार नाही. फडणवीस यांनाच आता या सगळ्याचं ओझं झालं आहे आणि त्यांनी ते फेकून देण्याचा निर्णय घेतला आहे.”
राज्य शासनाच्या स्थिरतेबाबत सुरू असलेल्या चर्चांना या विधानांमुळे पुन्हा जोर आला आहे. राऊतांनी सप्टेंबरपर्यंतचा उल्लेख करत सूचित केलं की मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे राज्यात खरंच काहीतरी मोठं राजकीय नाट्य उलगडणार का? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे.