शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सांगलीमध्ये भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. यानंतर राज्यभरात प्रतिक्रिया उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर समाजमाध्यमांवरुन एका पोस्टद्वारे टीका करत नवा वाद निर्माण केला आहे.

घटनेचा तपशील:
सोमवारी रात्री सांगलीतील माळी गल्ली भागातून जात असताना भटक्या कुत्र्याने भिडे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाला गंभीर चावा घेतल्यामुळे त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यांची तब्येत चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मिटकरींची सोशल मीडिया पोस्ट आणि प्रतिक्रिया:
भिडेंना कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर अमोल मिटकरी यांनी एक्स (माजी ट्विटर) वर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली. त्यांनी म्हटलं, “त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? जो कोणी असेल, त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी. खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवायला हवा. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का?”
या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी मिटकरींच्या टीकेला समर्थन दिलं, तर काहींनी ती अत्यंत अशोभनीय आणि वैयक्तिक हल्ला असल्याचं सांगितलं. यामुळे पुन्हा एकदा भिडे समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
सांगली महापालिकेची कारवाई
या घटनेनंतर सांगली महापालिकेने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. डॉग व्हॅन पथकाकडून शहरात ठिकठिकाणी कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
पोलीस आणि प्रशासनाची हालचाल
सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भिडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन अधिक जागरूक झाले असून भटक्या कुत्र्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.