बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत गंभीर आरोप करत हा थरार लाईव्ह पाहिला गेला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

78 दिवस उलटले, तरी तपास मंद
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 78 दिवस झाले असले तरी, अद्यापही पोलिस तपासाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह
या आंदोलनादरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की, “निवडणुकीदरम्यान उमेदवारांचे फोन टॅप केले जातात, मग या हत्येतील आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) का तपासले जात नाहीत?” तसेच, हत्येच्या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
हत्येचा थरार LIVE पाहिला गेला?
संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संपूर्ण गाव त्यांचा शोध घेत असताना, पोलीस निरीक्षक पाटील यांनाच त्यांचा मृतदेह कसा सापडला? हा योगायोग की काहीतरी मोठे कटकारस्थान? असा संशय सोनवणेंनी व्यक्त केला. त्याहून धक्कादायक म्हणजे, “देशमुख यांना मारताना संपूर्ण प्रकार लाईव्ह पाहिला जात होता,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
हा गौप्यस्फोट कोणाकडे निर्देश करतो?
बजरंग सोनवणे यांच्या या विधानानंतर चर्चेला उधाण आले आहे. हत्येच्या वेळी कोण लाईव्ह बघत होतं? हत्येच्या कटात कुणाचा सहभाग आहे? आणि पोलिसांचा यात काय संबंध आहे? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.