महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडविषयी एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यानुसार, वाल्मिक कराड याचा सिनेइंडस्ट्रीशी थेट संबंध होता. कासले यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि पुरावे शेअर केले आहेत, ज्यामध्ये कराडचे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचे आजीवन सदस्यत्व असल्याचे दिसून येते.

कासले यांच्या दाव्यानुसार, वाल्मिक कराड बीआरजे फिल्म प्रोडक्शन या निर्मिती संस्थेशी जोडला गेलेला होता. या प्रॉडक्शन हाऊसच्या बीकेसी स्थित ऑफिसचे काही फोटोही त्यांनी सार्वजनिक केले आहेत. हे सर्व पुरावे पाहता, कराड फक्त गुन्हेगारी क्षेत्रातच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातही त्याची सक्रिय भूमिका होती, असा संशय व्यक्त केला जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराडवर अनेक आरोप झाले आहेत. त्याचा संबंध खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांशी जोडला जातो. तसेच, काही वर्षांपूर्वी साधा घरगडी असलेला कराड अल्पावधीतच कोट्यवधींचा मालक कसा झाला, यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यासह विविध ठिकाणी त्याच्या मालकीच्या मोठ्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ माजली असून, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह अनेक नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. रणजीत कासले यांनी केलेल्या नव्या खुलाशांमुळे हे प्रकरण अधिकच गडद झाले आहे. पोलिसांकडून या नव्या माहितीचा तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.